खूप दिवस झाले ही वेबसाईट घेऊन, पण काही लेखन केले नाही. आज अचानक आठवण झाली की अरेच्चा, आपली पण साईट आहे की, जरा काही तरी लिहूया. आजपासून सुरुवात करतोय आणि आठवड्यातून एकदा तरी काही तरी लिहिण्याचा प्रयत्न करीन.
आधी माझी ओळख करून देतो. मी आहे एक सामान्य प्राणी. तुम्हाला R.K Laxman चा common man माहीत असेल ना, म्हणजे अगदी तस्साच. अंगात काही विशेष गुण नसलेला, ऑफिसात पाट्या टाकून झाल्या की पगाराची वाट बघणारा, बसमध्ये खिडकीजवळ जागा मिळाली की स्वर्ग मिळाल्याचा आनंद होणारा, वर्षातून एकदा LTA घेऊन कुठेतरी सहल करणारा आणि त्या आठवणींवर जगणारा १ जीव. रोजच्या या रहाटगाडग्यात जगताना मनात अनेक विचार येतात, पण ते सगळे कोणाला स्पष्ट असे सांगता येत नाहीत, मनातल्या खर्याखुर्या भावना जाहीर करता येत नाहीत. म्हणून हा प्रपंच.
इथे मी माझे स्पष्ट मत लिहिणार आहे. काहीही न लपवता. काही विचार तुमच्या विचारांसारखे असतील, काही नसतील. काही तुम्हाला पटतील, काही नाही पटणार. पण १ मात्र नक्की, आपल्याला विचारांची देवाणघेवाण तरी करता येईल.
फक्त १ विनंती, इथे शक्य तितके मराठीमध्ये लिहा. आणि दुसरे महत्वाचे म्हणजे, मी कोण आहे हे यदाकदाचित तुम्हाला कळले तर ते गुपित फक्त तुमच्याकडेच ठेवा. मुखवट्यामागे चेहरा कोणाचा आहे, ते कळले की स्पष्ट बोलण्यावर मर्यादा येते. धन्यवाद.