आत्ताच माझ्या घराचे उरलेले लोन फेडून परत आलो. आता खूप बरे वाटत आहे कारण आता घर स्वतःचे, पूर्ण मालकीचे झाले आहे. हा आनंद काही औरच आहे. पण हे काही माझे पहिले घर नाही.
खरं सांगू का? मी आयुष्यात पहिल्यांदा घर घेतलं ना, तेव्हा मला जितका आनंद झाला, तितका नंतर कधीच झाला नाही आणि कदाचित पुन्हा कधी होणारही नाही. त्याला कारण पण तसंच आहे. मी बाबांना सांगूनसुद्धा त्यांनी स्वतः घर घेतले नाही. आणि माझी नोकरी होती फिरतीची. मग मी स्वतःसाठी तरी घर कसं काय बघणार? बाबांना सांगितलं की तुम्ही घेत नाही तर मलातरी पैसे द्याल का? तर कुरकूर करत, फारतर १ लाख देईन म्हणाले. माझ्या मामाने सांगितलं की गोरेगावला त्याच्या सोसायटीत १ रूम किचन ६ लाखात आहे. त्या माणसाला गरज आहे, म्हणून त्याने किंमत कमी लावली आहे, तू नक्की घे. पण तेव्हा माझं वय होतं फक्त २३. खिशात दमडी नाही, घर घेणार तरी कुठून? मुंबईत अगदी चाळीत जागा घ्यायला पण त्याकाळी ४-५ लाख तरी लागत.
मी मनाशी ठरवलं की काहीही झालं तरी मी ५ वर्षाच्या आत स्वतःची जागा घेणार. त्याप्रमाणे मी पैसे साठवायला सुरुवात केली. त्याकाळी माझा पगार इतरांच्या मानाने चांगला होता (महिना ३.५ हजार) शिवाय नशीबाने पण साथ दिली म्हणून मी स्टॉक मार्केटमध्ये थोडे कमवले नी ३ वर्षात ५० हजार जमा केले. त्याकाळी एच.डी.एफ.सी.ने घरासाठी लोन द्यायला नुकतीच सुरुवात केली होती. त्यांच्याकडे गेलो, तर ते म्हणाले की आम्ही तुला २ लाख १० हजाराचे कर्ज देऊ. म्हणजे माझं बजेट होतं फार-फार तर ४ लाख. नशीबाने साथ मिळाली म्हणून जागा घेता आली. पण ३५०० रुपये महिना पगार असताना २७०८ रुपये दर महिना हप्ता देऊन घेतलेले घर म्हणजे माझ्या आयुष्यातली माझी सर्वात मोठी कमाई. कर्ज फेडून ते घर पूर्णपणे माझ्या हक्काचे झाले, तेव्हा जेव्हडा आनंद मला झाला, तेव्हडा आयुष्यात पुन्हा कधी होईल, याची शक्यता फार थोडी आहे.