मुलांचे शिक्षण

आत्ताच मिसळपाववर हा लेख वाचला. त्यात बरेच वेगळेवेगळे मुद्दे आले आहेत.

१. आपली प्रतिष्ठा मुलाच्या परीक्षेतील यश अपयश यावर अवलंबून असू नये. – हे एकदम मान्य आहे.
२. मुलाची/मुलीची क्षमता ओळखली पाहिजे – सहमत.
३. लोक फुकटचे सल्ले देण्यात एकदम पुढे असतात. – सहमत.

(आता माझा फुकटचा सल्ला)
डॉक्टरसाहेब म्हणतात

“त्याच्या चार वर्षाच्या अभियांत्रिकी ज्ञानापैकी फार तर २० टक्के ज्ञानाचा उपयोग होईल. तो आयुष्यात पुढे काय करणार आहे हे तुम्हाला कुठे माहिती आहे?”

हे तर कुठल्याही क्षेत्रात खरं आहे. अभियांत्रिकी झालो तर दहावीमध्ये शिकलेल्या इतिहासाचा काय उपयोग? डॉक्टर झालो तर बारावीत शिकलेल्या इंटिग्रेशनचा काय उपयोग? बी.एस.सी. करून मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह झालो, तर शिकलेल्या भौतिकशास्त्राचा काय उपयोग?

“शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते.”

तसं जर असेल, तर मग IAS च्या परीक्षेची तयारी करणारा अभियांत्रिकी व्हायची काय गरज आहे, बी.ए. पण चालेल की? याचे कारण म्हणजे रिस्क मॅनॅजमेंट. IAS परीक्षा पास नाही झाला तर अभियांत्रिकी होऊन कुठेतरी नोकरी तरी मिळू शकेल, बी.ए. होण्यापेक्षा बरे, असा त्यामागचा विचार असतो.

शिक्षणाचा उपयोग काय? तर तुम्हाला अधिक चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या मुलाला काय शिकायचे आहे, ते आधीच माहित आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण सगळ्याच (रादर बहुतेक) मुलांना असे माहीत नसते. चांगले कॉलेज का हवे तर त्याने तुम्हाला एक चांगला ब्रॅंड मिळतो, ज्यामुळे तुम्ही आयुष्याची सुरुवात थोड्या वरच्या पातळीवरून करू शकता. साधी गोष्ट आहे, कॉलेजने १७ लाख मागितले, तर तुम्ही विचारलंत ना की सुरुवातीचे पॅकेज ४ लाख(च) आहे का? तेच जर आय.आय.एम मध्ये १० लाख फी भरून २५ लाखाचे पॅकेज मिळाले असते, तर कसे वाटले असते?

“मुलाचा शिक्षणाचा कल महत्त्वाचा आहे.”

“पदवी मिळाल्यावर एक वर्ष तू काहीही केले नाहीस तरी चालेल. नुसता हातात कैमेरा घेऊन भारतभर फिरलास तरी चालेल. त्यात तुला आयुष्य जगायचे शिक्षण मिळेल ते तुला आयुष्यभर उपयोगी ठरेल.”

हे असे डायलॉग ३ एडियट सारख्या सिनेमात टाळ्या वाजवायला छान वाटतात. हातात कॅमेरा द्यायचा असेल तर मग आत्ताच का नको, पदवी मिळायची तरी का वाट बघायची? आज भारतासारख्या देशात, जिथे स्पर्धा इतकी बिकट आहे, तिथे अशी चैन बहुतेकांना परवडत नाही.

“पं. मल्लिकार्जुन मन्सूर. पं शिवकुमार शर्मा यांचे गायन / वादन पाहताना एक गोष्ट जाणवते कि ते आपल्या कार्यक्रमाचा आनंद पूर्णत्वाने घेतात त्यात त्यांना कष्ट होताना दिसत नाहीत असेच आपले शिक्षण आणि व्यवसाय असावा मग त्यात पैसे किती मिळाले किंवा नाही हे गौण असावे.”

“चित्रकला उत्कृष्ट असणारी माणसे रस्त्यावर चित्र काढून लोकांनी फेकलेले पैसे का उचलतात कारण आपली कला बाजारात विकायची कशी यासाठी लागणारे कौशल्य किंवा त्याला लागणारे संबंध त्यांच्याकडे नसतात.”

सर्वच जण कौशल्य असूनही यशस्वी होत नाहीत. त्याला नशीबपण लागते. जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन करणारा एम.एफ.हुसेन हजारात एखादाच होतो. बाकीचे त्याच गॅलरीसमोर फुटपाथवर प्रदर्शन लावून बसलेले असतात.

म्हणून मी माझ्या भाच्याला तो दहावीत असताना सांगितले होते की तू आता ७ वर्ष नीट अभ्यास करून यश मिळवलेस तर पुढची ७० वर्ष आरामात जगशील. पण त्याऐवजी आता ७ वर्ष आराम केलास तर पुढे ७० वर्ष भोगशील. आता तुला काय करायचं आहे, ते तू ठरव. (त्याची क्षमता काय आहे, ते ओळखून तितपतच अपेक्षा ठेवणे, इतपतच पालकांनी करावे.)

माझे मत आहे की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वतःला एक प्रॉडक्ट म्हणून समजले पाहिजे, एक एम्प्लॉई म्हणून नाही. आणि स्वतःचे मार्केटिंग व्यवस्थित केले पाहिजे आणि डोळे उघडे ठेऊन अजून कुठल्या नवीन संधी येत आहेत, ते बघितले पाहिजे. आपण स्वतः यशस्वी होत नसतो, तर इतर लोक आपल्याला यशस्वी करतात.

साधारणपणे यश, पैसा, कीर्ती, self-confidence, समाजातली पत हे एकत्रीत असतात. स्वतःच्या कर्तबगारीवर/आत्मविश्वासावर पैसा मिळू शकतो आणि खूप पैसा मिळाला की आत्मविश्वासपण वाढू शकतो. मग सोपा मार्ग का घेऊ नये?

शेवटी काय, आयुष्यात आपले समाधान कशात आहे ते प्रत्येकाला स्वतःलाच शोधावे लागते. पण खिशात भरपूर पैसा असेल, तर ते काम अधिक सोपे होते. Money can buy you happiness, but happiness cannot buy you money.

This entry was posted in मनातलं and tagged . Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.