कंपनीत काम करतय एक बुजगावणं!! क्लायंटला कामाचा भास निर्माण व्हावा म्हणून त्याचा जन्म!! बुजगावणं त्याचं काम चोख बजावत होतं. पण आपलं अस्तित्व हा एक आभास आहे ह्याची जाणीव नव्हती बिचाऱ्याला!! काम करता करता त्याचे हात हलत असत , त्याचं डोकं १८० अंशातूनही फिरून येत असे ह्यातच ते खुश होतं. आपल्याच विश्वात मग्न असणाऱ्या त्याला त्याच्यात आणि मॅनेजर या प्राण्यात असलेल्या फरकाबद्दल असलेली पूर्ण अनभिज्ञता हीच त्याच्या मुक्त मनाची ताकद होती…
अचानक असं काहीतरी झालं कि बुजगावणं शहाणं झालं ! आपण मॅनेजरप्रमाणे नाही आणि कधीच होवू शकणार नाही हे समजलं त्याला! जशी स्वत:च्या निर्जीवपणाची जाणीव झाली तसं ते बुजु लागलं, त्याने आपले कान बंद केले, डोळेसुद्धा मिटून घेतले…
आजही बुजगावणं आहे, त्याच कंपनीत, वाऱ्यावर अजूनही ते हलतं पण नाईलाजाने. बाह्यत: त्याचा उपयोग अजूनही होतो पण त्याचं असणं आणि नसणं हे त्याच्यादृष्टीने तरी सारखंच आहे!!
मी स्वतःला बुजगावण्याच्या जागी बघितले आणि सगळे तंतोतंत पटले.