भारतात राहायचं की परदेशात?

हा प्रतिसाद आधी मिपाच्या या धाग्यावर दिला होता.

मुळात “भारतीय” म्हणजे काय, याच्याबद्दलच माझ्या मनात संभ्रम आहे. केवळ भारतात जन्मलो, म्हणून मी भारतीय असे मलातरी वाटते. भारतात वाढलो, तिथल्या गोष्टींची मला सवय आहे, तिथे (जवळजवळ फुकटात) शिक्षण झाले त्याबद्दल आदर आहे, तिथले जेवण मला आवडते वगैरे वगैरे. पण खरं सांगायचं तर मी इतर कुठेही जन्मलो असतो (अमेरिका असो वा पनामा), तर माझ्या जन्मभूमीबद्दल आणि कर्मभूमीबद्दल मला असेच वाटले असते, याबद्दल मलातरी शंका नाही. मी बरेच वर्षे हॉस्टेलवर राहिलो (आई-वडील आणि नातेवाईकांपासून दूर), कामानिमित्त बरेच वर्षे फिरतीचा प्रवास असे, त्यामुळे “आपल्या” लोकांबद्दल फारशी ओढ नाही. जे सोबत आहेत, तेच मित्र आणी तेच नातेवाईक अशी वृत्ती झाली. कदाचित त्यामुळेच भारत हा “सोईस्कर देश” इतपतच प्रेम वाटते, पण पराकोटीचा अभिमान वगैरे काही वाटत नाही. तसेच, अमेरिकेलाच काही सोनं लागलं आहे, असे पण वाटत नाही. उद्या गरज पडली किंवा आवडले तर स्कँडेनेवियन देशात राहायची तयारी आहे आणि साउथ अमेरिकेत एखाद्या भारताहून गरीब देशाची पण तयारी आहे. आहे त्या परिस्थितीत समाधान मानायची तयारी असली आणि नावडत्या परिस्थितीतून मार्ग काढायची तयारी असली की त्रास होत नाही. मी या मताचा आहे. (आरक्षण या निव्वळ एका कारणासाठी भारताबाहेर वास्तव्य करावे असे माझे स्पष्ट मत आहे. भारतामधील जीवघेणी स्पर्धा, शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार आणि आरक्षण यांच्या जाळ्यात तुमच्या मुलांना टाकावेसे वाटते का, याचा विचार प्रत्येक पालकाने केला पाहिजे. सर्वत्र टीका होत असली तरीही भारतात उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते, असे माझे मत आहे. पण तरीही इतर बाबींचा विचार केला तर भारताबाहेर पडणे तितकेसे वाईट नाही. असो, तो मुद्दा वेगळा आहे.)

शिक्षण झाल्यावर मी भारतात नोकरी केली. सरकारने माझ्यावर इतका पैसा खर्च केला, सगळेच जर परदेशात गेले तर कसं काय होणार वगैरे विचार तेव्हा मनात होते. रग्गड पैसे मिळत होते, भारताबाहेर जायची गरजच न्हवती. हळूहळू मतपरिवर्तन होऊ लागले. कामानिमित्त चपराशापासून ते आय.ए.एस.पर्यंत सगळ्यांना पैसे चारून झाले. एकसे एक दिव्य अश्या बॉसबरोबर काम करून झाले, खिशात पैसे असूनही रेल्वेची तिकिटे मिळत नाहीत म्हणून “जुगाड” केले, “चलता है” म्हणणार्‍या सप्लायर्सचे लाड पुरवून घेतले. ( मी भारतातल्या इंफ्रास्ट्रक्चरबद्दल काही म्हणत नाहीये. भारतात राहाणार्‍यांनी धूळ आणि गर्दीबद्दल कितीही नावे ठेवली तरी इतरांनी जराही काही म्हणले की आवडत नाही, असा अनुभव आहे आणि त्यामुळे मी बोलतही नाही.) मग मनात विचार आला, की आज मी तरुण आहे, लग्न झालेलं नाही, पण हे असं किती दिवस चालणार? आपल्याला आयुष्यभर हे जमणार आहे का? आवडणार आहे का? मग मी भारताबाहेर पडण्याचा विचार केला. अमेरिकाच पाहिजे असं काही नाही, आधी ऑस्ट्रेलियाला प्रयत्न केला. सिंगापूर, मिडल ईस्ट, कॅनडा यांची पण तयारी होती. नोकरी इतक्या भरभक्कम पगाराची होती की दुसरे कुणी ऑफरच द्यायचे नाही.पण शेवटी बॉसला कंटाळून ३५% कमी पगारावर दुसरीकडे गेलो आणि मग तिथून परदेशात.

माझे काही मित्र अमेरिकेतून परत भारतात परत गेले आहेत. एकाने ६ वर्षात भरपूर पैसे कमवले आणि तो पुण्यात ४२ व्या वर्षी रिटायर झाला. अजून एक जण असाच पैसे कमवून आता मुंबईत नोकरी करतो, पण स्वतःच्या नियमानुसार. सकाळी ११ ते ८ अशी वेळ आहे, तर नेमक्या त्याच वेळात काम करतो. शनिवार-रविवार फक्त फॅमिलीसाठी. सांगायचे काय तर पुरेसे पैसे असले तर स्वतःच्या इच्छेनुसार जगता येते, मग ते भारतात असो किंवा अमेरिकेत किंवा अजून कुठे. माझ्या मुलीने सांगितले की तिला अ‍ॅकेडमीमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली पण तिला जायचे नाही, कारण तिथे फक्त अभ्यास आहे, तिचे आवडते पेंटिंग हा विषय नाही. मी म्हणालो, जायचे नसेल तर जाऊ नको. आम्ही घरी मराठी टीव्ही बघतो, भारतीय जेवण बनवतो, पण का? तर ते सहज जमते आणि सवय आहे म्हणून. “भारतीयत्व” जपण्यासाठी इथे कित्येक आई-वडील बळंबळं मुलांना टेंपलमध्ये नेतात, भारतीय कपडे घालायला लावतात, भारतीय जेवणच खायचे ही सक्ती करतात. अरे कशाला? मराठी शिकण्याऐवजी स्पॅनिश किंवा चायनीज (मँडॅरिन) शिकवा ना त्यांना. समरमध्ये अट्टाहासाने भारतातच जायचे त्यापेक्षा दुसर्‍या कुठल्या देशात सर्वांनी जा, असे माझे मत आहे. मुलांसाठी पुरेसे पैसे कमवले की त्यांना त्यांच्या मनासारखे शिकवता पण येईल, बरेच भारतीय-वंशाचे पालक, त्यांच्या मुलांना डॉक्टरच बनले पाहिजेस असे सांगतात, तसे तरी करावे लागणार नाही. शेवटी काय, प्रत्येक जण त्याच्या नशीबाने जगतो, योग्य दिशा दाखवणे इतकेच आपण करू शकतो.

थोडक्यात काय? फ्लेक्सिबल राहा. जिथे संधी मिळेल तिथे जा. आणि एकदा निर्णय घेतला की त्याबद्दल दु:ख करू नका कारण “त्या परिस्थितीत” तुम्ही “त्या वेळी योग्य” असा निर्णय घेतलेला असतो. कमी पैशाने त्रास जरूर होतो, पण उत्पन्न $७५,००० असले की आयुष्यातला आनंद फारसा वाढत नाही. मॅस्लोच्या पिरॅमिडप्रमाणे, एकदा बेसिक गरजा भागल्या की मग तुम्ही तुमचा जीवनातला आनंद (Self-actualization) कुठे शोधायचा ते ठरवा. तेच खरे समाधानी जीवन.

This entry was posted in मनातलं and tagged . Bookmark the permalink.

1 Response to भारतात राहायचं की परदेशात?

  1. Samo(Mabo) says:

    Dear Sir,
    I happened to come across your blog. I find your thoughts down to earth & practical, pragmatic. Liked this article very much. I would love to explore your blog.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.