कंपन्यांना त्यांचा माल तुम्हाला विकायचा असतो आणि त्यासाठी ते मार्केटिंग करतात, ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. आता मार्केटिंग करायचे तर त्याला खर्च येतो. अनावश्यक खर्च झाला तर फायदा कमी होतो. त्यामुळे मार्केटिंग हे कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त, यशस्वी कसे होईल, जाहिराती योग्य त्या लोकांना किंवा कंपन्याना कश्या पोचतील हे बघणे, हे कंपन्यांचे उद्दिष्ट असते. (किंवा असायला हवे). एक उदाहरण म्हणजे समजा तुमची कंपनी, शेतीवर कीड लागू नये याचे फवारणी यंत्र बनवत असेल तर त्याची जाहिरात मुंबई, पुणे या शहरात करून काय फायदा? त्याची जाहिरात अशा ठिकाणी झाली पाहिजे की जिथे शेती होते. मग अश्या जाहिराती यशस्वी होण्याची शक्यता जास्त. याउलट साड्या विकणारी कंपनी असेल तर मग कुठल्याही ठिकाणी चालू शकेल, सर्वच स्त्रियांना ती जाहिरात परिणामकारक ठरू शकते.
त्यामुळे कंपनीला ग्राहकांबद्दल जास्तीत जास्त माहिती, त्यांची आवड-निवड जाणून घेणे गरजेचे पडते. ग्राहकाबद्दल जितकी माहिती मिळेल तितका त्याचा उपयोग जास्त. हे तर आपण स्वतः पण करत असतो. आता समजा एखादा फ्लॅट घ्यायचा आहे आणि जर कळलं की विकणारा NRI आहे आणि त्याला पुढच्या आठवड्यात परत जायचे आहे किंवा एखाद्याला पैशाची चणचण आहे, मग अश्यावेळी विकत घेणारा २-४ लाख किंमत कमी सांगतो ना? कंपन्यांचं पण तसंच आहे.
कंपनीला ग्राहकाबद्दल काय काय माहिती हवी असते?
१. आयडेंडिटी डेटा:
पूर्ण नाव, टोपणनाव, जन्मतारीख, स्त्री की पुरुष, घराचा पूर्ण पत्ता, घरचा फोन नंबर, ऑफिस फोन नंबर, मोबाईल नंबर, पर्सनल इमेल, ऑफिस इमेल, सोशल मिडिया अकाउंट (फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन), तुमचा अकाउंट नंबर, यूजर आय.डी., कंपनीचे नाव, हुद्दा, डिपार्टमेंट नाव, बॉसचे नाव, तुम्ही मार्केटिंगला होकार दिला आहे का की नकार दिला आहे इत्यादी.
२. ट्रान्सॅक्शन डेटा
कुठे खरेदी केली (दुकानात कुठली, ऑनलाइन कुठली), कुठले प्रॉडक्ट घेतले, किती प्रॉडक्ट घेतले, शॉपिंगकार्टमध्ये कुठले सोडले, किती क्लिक्स केले, किती किंमत दिली, कूपन वापरले का? प्रॉडक्ट सब्स्क्रिप्शन घेतली का, रिन्यूअल तारीख, प्रॉडक्ट परत केला का, किती दिवसांनी केला, किती वेळा परत केला, कस्टमर सपोर्टला संपर्क केला का, इमेल ने केला की फोन केला, किती वेळा केला, किती वेळ बोलला, ऑनलाइन अॅक्टिव्हिटी, इतर कुठल्या वेब साइट बघितल्या, कुठले रिव्हू वाचले, फेसबूक लाइक्स, ट्विटर किती वापरले
३. लाइफ स्टाईल डेटा:
वैवाहिक माहिती, लग्न झाले आहे की नाही, झाले असेल तर अॅनिव्हर्सरी तारीख, सिंगल आहात का, बॉयफ्रेंड/ गर्लफ्रेंड आहे का?, विधवा/विधुर, मुले किती, त्यांची वये, मालकीचे घर आहे की भाड्याचे, घरात कार आहे का? किती? कुठली? कारला दरवाजे किती? (२ की ४), इतर कुठली वहाने आहेत, आर्वजनिक वहान वापरता का? घरी पेट आहे का? कुठले पेट? प्रोफेशन काय आहे? शिक्षण किती झाले आहे? प्रवासाची आवड आहे का?
४. इतर डेटा
तुम्हाला आमची कस्टमर सेवा कशी वाटली, प्रॉडक्ट कसा वाटला, परत घ्याल का? मित्रांना सांगाल का, आफ्टर सेल्स सेवा कशी वाटली, रिपेर सेवा कशी वाटली? तुमचा आवडता रंग, आवडते ठिकाण, आवडते रेस्टॉरंट, तुम्ही प्रॉडक्ट का घेतला (स्वतःसाठी, गिफ्ट देण्यासाठी, मित्राला गिफ्ट की कॉर्पोरेट गिफ्ट, प्रॉडक्ट घेताना काय आवडले (किंमत, फीचर्स, रंग, क्वालिटी), सोईस्कर ठिकाणी मिळाले का? वगैरे.
You’re Not the Customer; You’re the Product.
आपण एक लक्षात ठेवले पाहिजे की जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. तुम्हाला ती फुकट मिळाली तरी त्याच्यासाठी कुणाला तरी खर्च करावाच लागतो. त्यामुळे तो खर्च तुमच्याकडून कळत-नकळत या ना त्या प्रकारे वसूल केला जातो.
पण तुम्ही म्हणाल की माझ्याकडे तर लपवण्यासारखे काहीच नाही, मग मी कशाला काळजी करू?
याच्यावर माझे उत्तर आहे: I don’t have anything to hide, but I don’t have anything to show you either.
(क्रमशः)