सर्वात आधी विचार करुया की आपल्या माहितीची कुणाला गरज आहे? गंमत अशी आहे की जवळपास सगळ्याच कंपन्यांना ग्राहकांची माहिती हवी असते. मग ती एखादी बँक असो वा इंशुरन्स कंपनी, कपडे विकणारी कंपनी असो वा अॅमेझॉन. कुठलीही कंपनी असो, गूगल, अमॅझॉन, फेसबुक, अॅपल, मायक्रोसॉफ्ट हे सगळे यात गुंतलेले आहेत.
जाहिराती दाखवून आपला माल जास्तीत जास्त लोकांना कसा विकता येईल, वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या किमतीत माल विकून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल, याचा विचार कंपन्या करतात. वरवर पाहता हे योग्य आहे. कंपनीला जास्तीत जास्त किंमतीत माल विकून फायदा कमवायचा आहे आणि आपल्याला स्वस्तात स्वत तोच माल घ्यायचा आहे. पण हे पारडे कंपन्या स्वतःच्या बाजूने झुकवायला बघतात. आणि त्याच्यासाठी फेसबुक, गूगलसारख्या जाहिरातदार कंपन्या त्यांना मदत करतात.
फुकट किंवा स्वस्त मालाची जाहिरात करून कंपन्या इतर प्रकारे स्वत:चा फायदा करून घेतात. तो म्हणजे तुमची खाजगी माहिती मिळवून. उदा: समजा तुम्हाला मुंबईहून दिल्लीला विमानाने जायचे आहे आणि तुम्ही अॅपलचा लॅपटॉप वापरून तिकिटे बघत आहात, तर कंपनीला कळते. अॅपलचा ग्राहक जरा उच्च्भ्रू असतो म्हणून ते तुम्हाला तिकिटाची किंमत जरा वाढवून सांगतात. जर कुणी घाईत असेल किंवा जर कुणाला कल्पना नसेल तर तो जास्त किमतीत खरेदी करतो, ज्यामुळे कंपनीला अर्थातच जास्त फायदा होतो. म्हणजे तुम्ही प्रायव्हसी ऐवजी फक्त सोय बघितली, २-४ ठिकाणी त्याच तिकिटाची चौकशी केली नाही तर तो व्यवहार तोट्याचा पडू शकतो. समजा १ कुटुंबातील ४ जण सिंगापूरला सहलीला चालले आहेत आणि १ तिकिट २ हजार रुपये महाग पडले, तर तुम्हाला ८ हजाराचा फटका पडला ना?
आता निव्वळ फेसबुकचे उदाहरण घेऊ की त्यांनी आजपर्यंत खाजगी माहितीचा कसा दुरुपयोग केला आहे.
युजरची माहिती संमतीशिवाय विकण्याचा फेसबुकला बराच पूर्वीपासून अनुभव आहे. Federal Trade Commission (FTC) ने २०१२ सालीच फेसबुकला दणका दिला होता.
व्हॉटसअॅप आणि युजर प्रायव्हसीचा हा पहिलाच प्रयत्न नाही. ४ वर्षांपूर्वी (२०१६ साली) असाच प्रयत्न केला होता.
फेसबुक युजरबद्दल ९८ प्रकारची माहिती गोळा करते आणि त्याचा वापर जाहिरात दाखवण्यासाठी करते.
फेसबुकवर फसवाफसवी चालते. कंपन्या पैसे देऊन खोट्या प्रोफाइल्स बनवू शकतात आणि लाइक्स विकत घेऊ शकतात. याचा उपयोग आपल्या बाजूने जनमत तयार करायला होतो.
फेसबुकवर तुम्ही प्रायव्हेट अकाउंट तयार करू शकत नाही, टोपण नाव वापरू शकत नाही. तिथे तुमची खरीखुरी माहितीच द्यावी लागते, ज्याचा वापर मग ते जाहिराती दाखवण्यासाठी करतात.
प्रायव्हसी सेटिंग्स फेसबुक मुद्दाम लपवून ठेवते किंवा बदलत रहाते, ज्यामुळे युजरला स्वतःची माहिती प्रायव्हेट ठेवायला जास्तीत जास्त त्रास होईल.
फेसबुक स्वतःपण इतरांकडून युजर डेटा विकत घेते, पण ते सांगत नाही.
फेसबुक कंपनी युजर डेटा स्वतःकडे ठेवत असली तरी जाहिरातदारांना विकते. उदा. केंब्रिज अॅनॅलिटिका आणि मास्टरकार्ड
फेसबुकने माहिती कमीत कमी ४ चायनीज कंपन्यांना (Huawei, Lenovo, Oppo and TCL) पण विकली आहे ज्या अमेरिकन इंटेलिजन्सनुसार चायनीज सरकारबरोबर संलग्न आहेत.
फेसबुकने जाहिरातीचे उत्पन्न मिळवण्यासाठी किती फसवाफसवी केली आहे आणि युजर डेटाचा किती दुरुपयोग केला आहे, अश्या अनेक लिंक्स उपलब्ध आहेत, पण त्या सगळ्याच शोधणे मला शक्य नाही. पण शोधल्यास तुम्हाला अजून माहिती नक्की मिळेल.
लोकांची माहिती गोळा करून त्याचा वापर करणारे स्वतःच्या प्रायव्हसीबाबत मात्र खूप जागरुक असतात.
मार्क झुकरबर्गला जेव्हा विचारलं की तू काल कुठल्या हॉटेलमध्ये राहिलास याची माहिती देशील का? तेव्हा त्याने काय उत्तर दिले ते बघा.
शिवाय, स्वतःची प्रायव्हसी जपण्यासाठी त्याने शेजारची ४ घरे ३० मिलियन डॉलरला विकत घेतली. हवाईमध्ये सुद्धा प्रायव्हसी जपण्यासाठी घराभोवती उंच भिंत बांधली.
माहितीचा दुरुपयोग अति झाला तर खाली लिहिलेली परिस्थिती वास्तवात यायला वेळ लागणार नाही.
हॅलो, हा फेमस पिझा कंपनीचा फोन नंबर आहे का?
नाही, आम्ही गूगल पिझा कंपनी आहोत.
ओह, मी चुकीचा नंबर डायल केलेला दिसतोय.
नाही सर, आम्ही आता त्या कंपनीला विकत घेतलंय.
असं आहे होय. बरं, मला पिझा ऑर्डर द्यायची होती.
सर, तुमची नेहमीचीच ऑर्डर का?
नेहमीचीच? तुम्हाला काय माहीत ते?
सर, तुमच्या फोननंबर वरून आम्हाला माहीत आहे की गेल्या १५ वेळेला तुम्ही १२ स्लाइसचा लार्ज पिझा विथ डबल चीज, सॉसेज आणि थिक क्रस्ट ऑर्डर केला आहे.
हो, या वेळी पण तोच पाहिजे.
सर, मी सुचवू का की या वेळेस तुम्ही ८ स्लाइसचा व्हेजिटेबल पिझा विथ ब्रोकोली, मश्रुम आणि टोमॅटो असा घ्यावा.
नको, मला तो भाज्यांचा पिझा आवडत नाही.
पण सर, तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त आहे.
तुम्हाला काय माहीत?
तुमच्या एमेलमधल्या गेल्या ७ वर्षांच्या रिपोर्टवरून कळले तसे.
असु दे, असु दे. पण मला नकोय तो पिझा. आणि तसं पण मी कोलेस्ट्रॉलचं औषध घेतो.
पण सर, तुम्ही औषध नियमीत घेत नाही. गेल्यावेळी तुम्ही हॅपिहेल्थ फार्मसीमधून फक्त ३० टॅबलेट्स खरेदी केल्या त्या पण ४ महिन्यांपूर्वी.
मी अजून टॅबलेट्स दुसर्या फार्मसीमधून घेतल्या.
पण सर, तुमच्या क्रेडिट कार्डवर तसं काही दिसत नाहीये.
मी रोख पैसे दिले.
पण सर, तुमच्या बँक स्टेटमेंटवर तर दिसत नाहीये की तुम्ही पुरेसे पैसे काढले.
माझ्याकडे उत्पन्नाचा दुसरा सोर्स आहे.
पण सर, अशी रक्कम जाहीर केलेलं तुमच्या टॅक्स रिटर्नवर दिसत नाहीये.
खड्ड्यात गेला तुमचा पिझा. मला या गूगल, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप सगळ्याचा वीट आला आहे. मी आता दूर एका बेटावर जाऊन राहाणार आहे, जिथे फोन पण नसेल आणि इंटरनेट पण नसेल.
मला तुमच्या भावना समजतात. पण सर, तुम्ही पासपोर्टशिवाय जाणारच कसे? कारण आमच्या रेकॉर्डनुसार तर तो २ महिन्यापूर्वीच संपला.
Remember: You’re Not the Customer; You’re the Product