“शिकायचं कसं” ते शिकूया

नवीन वर्ष आलं की आपण उत्साहाने संकल्प करतो की आता नवीन काही तरी शिकूया. म्हणजे नवीन काहीतरी शिकायचा उत्साह एरवीसुद्धा अधून मधून येतच असतो, पण नवीन वर्ष म्हटलं की तो उत्साह जरा जास्तच असतो. पण होतं काय की आपण २-४ दिवस शिकायला बसतो, मग काहीतरी महत्वाचे काम येते किंवा कंटाळा येतो, मग आजच्या ऐवजी उद्या करू असे वाटते आणि ते काम रंगाळत जाते आणि मग शेवटी बंदच पडते. असे होऊ नये, म्हणून मी काय करतो ते मांडायचा हा प्रयत्न.

SMART Goals स्मार्ट गोल्स
सर्वात आधी मी काय शिकायचे ते ठरवतो आणि त्यासाठी SMART Goals ही पद्धत वापरतो. SMART म्हणजे Specific, Measurable, Achievable, Relevant, Time bound. उदा. मी एक महिन्यात ३० किमी पळणार, एक महिन्यात ५ किलो वजन कमी करणार, ३ महिन्यात कोर्सेरावर जावास्क्रिप्टचा कोर्स पूर्ण करणार, ६ महिन्यात PMP सर्टिफिकेशन पूर्ण करणार वगैरे. तुम्हाला आवडेल ते उद्दिष्ट. व्यक्तिशः मी एका वेळी ३ पेक्षा जास्त गोल्स ठरवत नाही.

फाइनमन
मी रिचर्ड फाइनमन या वैज्ञानिकामुळे खूप प्रभावित आहे. त्याचा मृत्यू झाला तेव्हाचा त्याचा फळा बघितला तेव्हा त्याच्यावर “अजून काय शिकायचे आहे” TO LEARN याची यादी त्याने लिहिली होती. तेव्हापासून मी पण ती पद्धत वापरतो आणि मला रोज सकाळी दिसेल अश्या ठि़काणी मी असा एक फळा लावला आहे.

चेकलिस्ट
मी सुरुवातीपासून चेकलिस्ट वापरत आलो आहे. करियरमध्ये याचा असा फायदा झाला होता की होणार्‍या चुका टाळता येत असत आणि नेहमी उत्तम दर्जाचे काम होत असे. दुसरा फायदा असा आहे की त्यामुळे एखादे मोठे काम छोट्याछोट्या भागांमध्ये विभागून करता येत असे. नवीन काही शिकण्यासाठीपण मी चेकलिस्ट वापरतो. मात्र स्वानुभवामुळे माझ्या चेकलिस्टमध्ये ७ पेक्षा जास्त मोठी यादी नसते, नाही तर कामाचा फार मोठा डोंगर समोर उभा आहे असे वाटून काहीच होत नाही.

इंडेक्स कार्ड
मी स्वतः Visual learner आहे, त्यामुळे मला ठोकळे, फ्लो चार्ट यामधून अधिक सहज शिकता येते. मी छोटी छोटी इंडेक्स कार्ड (Index card) वापरून नोट्स बनवतो. त्यासाठी पेन्सिलचा वापर जास्त करतो कारण खाडाखोड सहज शक्य होते. स्वतःच्या हाताने लिहून मला चांगले समजते आणि लक्षात रहाते, असा माझा अनुभव आहे. तुम्ही auditory learner असाल तर कदाचित पुस्तके ऐकून तुम्हाला चांगले शिकता येईल, मला कल्पना नाही कारण मला ऑडिओ पुस्तके आवडत नाहीत.

पोमोडोरो टेक्निक
या पद्धतीत तुम्ही टायमर लाऊन शिकता, म्हणजे २५ मिनिटे शिकायचे आणि मग ५ मिनिटे विश्रांती घ्यायची. मी कधी कधी ४५ + १५ अशी विभागणी पण वापरतो.

शिकणे हे मॅरॅथॉनसारखे आहे. आपण २ दिवसात दूरचा पल्ला गाठू शकत नाही, हळू हळू सराव फार महत्वाचा आहे. त्यामुळे एखाद्या वेळी जमले नाही, कंटाळा आला तरी त्यात खंड पडू देऊ नका. एकदा सवय लागली की सोपे पडते आणि नवीन काही शिकून झाले की जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. नवीन शिकण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

कसे शिकायचे नाही?
१. परत परत तेच वाचायचे नाही. थोडे थोडे का असेना, पुढे सरकत रहायचे.
२. एखादी गोष्ट जमत नाही म्हणून पटकन उत्तर बघू नका. हवा तर थोडा ब्रेक घ्या आणि परत एकदा प्रयत्न करा.
३. मनापासून काही शिकायचे असेल आणि लाँग टर्म मेमरीत जावे असे वाटत असेल तर अगदी शेवटच्या क्षणी नवीन गोष्ट शिकायला जाऊ नका.
४. पुरेशी झोप आणि विश्रांती टाळू नका.

या लेखातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळाले असेल, अशी आशा आहे. 😉

This entry was posted in मनातलं and tagged , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.