भारतात जिथे तिथे गांधी, नेहरू यांची नावे दिसतात. त्यांच्या नावाने रस्ते, उद्याने, वेगवेगळी स्मारके, पुतळे, संस्था या सरकारी खर्चाने बांधल्या आहेत. महाराष्ट्रातपण छत्रपती शिवाजी, ठाकरे यांची नावे सगळीकडे दिसतात.
पण भारताचे खरे शिल्पकार जे आहेत, त्यांना भारतीय विसरलेत का? असा प्रश्न पडतो.
सुरुवात करुया भारतीय सैन्यापासून. सैन्याचे शौर्य आणि त्याचे कौतुक करणारी आर्मी. पण बांगलादेश स्वातंत्र्याचे शिल्पकार, आर्मीचे सर्वोच्च रँक असणारे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ जेव्हा दिवंगत झाले, तेव्हा कुठे होते? ५ स्टारच्या या ऑफिसरच्या अंत्यविधीला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, डिफेन्स मिनिस्टर, तिन्ही दलांचे (भूदल, नौदल, वायुदल) चीफ ऑफ स्टाफ, राज्याचे मुख्यमंत्री कुणीही हजर न्हवते. इतकेच नाही तर राष्ट्रीय दुखवटा पण जाहीर केला गेला नाही.
असेच दुसरे उदाहरण म्हणजे जे आर. डी. टाटा यांचे. त्यांच्यामुळे भारतात एअर इंडिया ही विमानसेवा सुरू झाली. नवी मुंबई विमानतळाला नाव कुणाचे द्यावे, या चर्चेत त्यांचे नाव पण सुचवले गेले होते. खरं तर फार पूर्वीच मुंबई विमानतळाला त्यांचे नाव द्यायला हवे होते. यावेळी ती चूक सुधारायची संधी होती, पण तसे होणार नाही याची हळहळ वाटते. नेहमीप्रमाणे राजकारणात जे.आर.डी. टाटा यांचे नाव मागे पडणार यात मलातरी शंका नाही. गांधी, नेहरू, शिवाजी, ठाकरे, इतर स्थानिक राजकारणी यांच्यापुढे फडतूस टाटांना कोण विचारतो?