१. तुम्हाला सिगरेट,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?
मुळात मी सिगरेट का प्यायला लागलो, इथून सुरुवात करावी लागेल. माझे वडील गेले अनेक वर्षे तंबाखू खातात, पण मला ते कधीच आवडले नाही. त्यामुळे चघळायचे प्रकार मी कधीच केले नाहीत म्हणजे पान, तंबाखू-चुना, गुटखा, पानमसाला वगैरे.
माझा असा स्वभाव आहे, की एखादी गोष्ट करावी वाटली की मी ती करतो. मरताना असं वाटायला नको की अरे, आपण हे करायला हवे होते आणि ते केले नाही. निव्वळ त्या कल्पनेतून मी पहिली सिगरेट प्यायलो, अजून आठवतंय VJTI च्या वार्षिक संमेलनात, मित्राबरोबर. मला कधीही, कुणीही सिगरेट पी म्हणून सांगितले नाही, मित्र पित होते तरी त्यांनीपण कधी ऑफर केली नाही, तरीही. पहिली वेळ होती म्हणून मेंथॉलची सिगरेट प्यायलो, घाबरत घाबरत झुरका घेतला, खोकला वगैरे काही आला नाही, अर्ध्या मिनिटात डोके मंद गरगरले (मित्र म्हणाला तुला “किक” बसली). आणि ती आयुष्यातली पहिली चूक झाली. दुसऱ्या दिवशी पानवाल्याकडे जाऊन “पूर्ण” सिगरेट स्वतः प्यायलो आणि मित्रासमोर फुशारकीने सांगितले. ती आयुष्यातली दुसरी चूक झाली. हळूहळू दिवसाला १-२-५ असे प्रमाण वाढत होते. पण तरी वाटायच की हॅ, आपल्याला काही व्यसन नाही, मी कधीही सोडू शकतो. ती आयुष्यातली तिसरी चूक झाली. हळूहळू ते प्रकार वाढत गेले, नोकरीला लागल्यावर स्वतःचा पैसा आला आणि मग all hell broke loose.
२. हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?
खूप केले. सांगतो पुढे.
३. पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुरुवातच करू नका. पण जर लागले, तर पाण्याच्या सहवासात रहा. जमले तर रोज पोहायला जा. ते नाही जमले तर दिवसातून दोनदा गार पाण्याने आंघोळ करा. तेपण नाही जमले तर तलफ येईल तेव्हा घोटभर पाणी प्या. जास्त नाही, फक्त १ घोट, केवळ तोंड ओलसर करायला. कारण क्रेविंग आले की तोंडाला कोरड पडते, सिगरेट प्यावीशी वाटते. ते क्रेविंग आपल्याला मारायचे आहे. त्यासाठी तोंड ओले पाहिजे.
४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते? – माहीत नाही.
५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?
बरेच आहेत. पैशाची नासाडी होत नाही, आयुष्याचे मातेरे होत नाही, तब्बेत चांगली राहाते, लपूनछपून सिगरेट प्यावी लागत नाही, कपड्यांना वास येत नाही, दात पिवळे होत नाहीत. (मी सिगरेट सोडून जवळपास २० वर्ष झाली पण अजूनही माझे दात पिवळे पडले आहेत. लंग्ज तर मला बघता येत नाहीत तिथे किती वाटोळं झालं आहे ते. एकदा नुकसान झाले की ते कधीच भरून येत नाही.)
जेव्हा तुम्ही १ आठवडा यशस्वी व्हाल, तेव्हा वाचलेल्या पैशातून स्वतःला गिफ्ट द्या (सिनेमा बघा, पुस्तक घ्या, पर्फ्युम घ्या, बायको/प्रेयसी/मुलांसाठी गिफ्ट घ्या वगैरे). मी वाचलेल्या पैशातून एका अनाथ मुलीच्या शिक्षणाचा खर्च करायचो. त्यातून तुमचा हुरूप अजून वाढेल. तुम्ही प्रयत्न करत रहा. तुमचे व्यसन नक्की सुटेल. जर मला जमले तर तुम्हाला पण नक्की जमेल. धीर सोडू नका. Keep trying and marching towards your goal. तुम्हाला शुभेच्छा.
व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न:
खूप केले. सांगतो. मी कामानिमित्त वरचेवर दौऱ्यावर जायचो. तिथे घरचे कुणी नसायचे, त्यामुळे कुणाला कळेल, कपड्याना वास येईल ही भिती नसायची. त्यामुळे सिगरेट पिणे खूप वाढले. तेव्हा ऑफिसमध्ये पण सेंट्रलाएज्ड एसी होते, हुद्दा मोठा होता त्यामुळे कुणाला भीक न घालता सिगरेट प्यायचो. दौऱ्यावर असताना एक दिवस मला उठल्या-उठल्या दात घासायच्या आधीच सिगरेट प्यावीशी वाटली आणि तेव्हा पहिल्यांदा साक्षात्कार झाला की आपल्याला व्यसन लागले आहे. ही फार मोठ्ठी गोष्ट आहे की आपल्याला स्वतःला हे कळले पाहिजे.
मग मी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सगळे म्हणतात तसे कोल्ड टर्कीने सुरुवात केली. १ दिवस बरा गेला मग परत येरे माझ्या मागल्या. मग पाकिट बाळगणे बंद केले. म्हणजे सिगरेट प्यायची तर झक्कत बाहेर जावे लागायचे. त्रास व्हायचा. कमी जायचो, पण तरीपण जायचो. मग खिशात पैसे ठेवणेच बंद केले. पण मग त्यामुळे ऑफिसात इतरांकडे सिगरेट मागायला लागलो. एक दिवस कानावर पडले की “साला, इतना बडा समझता है, लेकिन भिकारी की तरह सिगरेट मांगता है”. ते खूपच मनाला लागले आणि मग सिगरेट मागणे पण बंद केले. रादर बंद झाले, पण पूर्ण नाही झाले. बाहेर कधीतरी प्यायचोच, पण २ सिगरेटच्या दरम्यानचे अंतर वाढले. नंतर मला स्वतःच जाणवले की मी कधीच चालता-चालता सिगरेट पीत नाही. एकाजागी शांत बसून झुरके घ्यायलाच मला आवडते. त्यामुळे सिगरेटची तलफ आली की मी उठून चालू पडायचो, पण पानटपरीपासून दूर. तेव्हा मला अतिशय महत्वाचा शोध लागला. सिगरेट प्याविशी वाटली की तोंड कोरडे पडते. मग मी पाणी प्यायला सुरुवात केली. त्याने खूप फायदा झाला. इतके झाले तरी अजून १००% यश न्हवते. त्याच्यासाठी कोल्ड टर्की लागते. आमच्या ओळखीचे १ गृहस्थ होते (माझी आई त्यांच्या ऑफिसात काम करत असे, मी त्यांना आजोबा म्हणायचो). ते अतिशय श्रीमंत आणि यशस्वी होते. माझी आई सांगायची की ते २२ वर्षे रोज “५५५” चा ५० सिगरेटचा एक डबा (बहुदा त्याकाळी डबे होते, मला माहित नाही) आणि कधीकधी वर अजून १० प्यायचे. त्यांची बोटेपण निकोटिनने पिवळी पडली होती. ते एकदा पावसात घरी चालले होते आणि नेमकी काड्यापेटी संपली. तेव्हा मित्र त्यांना हिणवून काहीतरी बोलला तर त्यांनी तिथल्या तिथे “५५५” चा डबा फेकला आणि म्हणाले की मी आजपासून सिगरेट सोडली. ते आयुष्यात कधीच सिगरेट प्यायले नाहीत. मी तर त्यांना कधीच सिगरेट पिताना बघितले न्हवते, ते एकेकाळी सिगरेट प्यायचे याच्यावर पण माझा विश्वास न्हवता. पण एक हुरूप आला की हा माणूस २२ वर्षांनी जर सिगरेट सोडू शकतो, तर मी पण करू शकतो. नंतर मी जे.आर.डी. टाटा यांच्या एका पुस्तकात वाचले की त्यांनी पण एका दिवशी अशीच सिगरेट थांबवली. शेवटी मी पण एक दिवस कोल्ड टर्कीने सिगरेट थांबवली. कुठलाही विशेष दिवस निवडला नाही, कारण जर रिलॅप्स झाला तर मग पुढचा “विशेष दिवस” दिसला असता आणि मला ते नको होते. तुम्हाला हे सगळे पटकन झाले असे वाटेल, पण ही फार मोठी प्रोसेस होती.
मी एकेकाळी इतका कट्टर व्यसनाधीन होतो, हे माझ्या जवळच्या बऱ्याच लोकांना माहीतही नाही आणि माहीत झाले तरी त्यांचा विश्वास बसणार नाही, अशी परिस्थिती आहे. आता जवळपास २० वर्ष झाली. आज लिहिताना पण अंगावर काटा आला आहे, इतका तो प्रवास खडतर होता. पण आज मिळणारे समाधान नक्कीच अनमोल आहे.
व्वा!
लेख वाचून फार मस्त वाटलं.
एखाद्याच शरीरीला अपायकारक असलेलें व्यसन सुटलं तर मला नेहमीच छान वाटतं.
तुमच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना नक्कीच खूप आनंद झाला असेल. त्याची किंमत करताच येऊ शकत नाही.