समजा तुम्ही आयुष्यात अगदी तृप्त असाल तर काय कराल, हा प्रश्न मला नेहमी पडतो. म्हणजे मनासारखे जगायला काय कराल? बहुतेक वेळा आपण बऱ्याच गोष्टी करतो त्या पैसे मिळतात म्हणून किंवा बॉस अथवा इतर कुणाकडून कौतुक मिळावे म्हणून. पण समजा तुमच्याकडे पुरेसा किंबहुना गरजेपेक्षा जास्तच पैसा आहे, आणि तुम्हाला कुणाच्या कौतुकाची अपेक्षाही नाही किंवा तशी गरजही भासत नाही, मग तुम्ही कसे जगाल? नवीन काय कराल किंवा काय करायचे बंद कराल?
म्हणजे लोकं म्हणतात ना की थू तुझ्या जिंदगीवर, तू नेहमी बॉसची चाकरी केलीस, मान खाली घालून फक्त काम केलेस, तू काय केलेस तुझ्या आयुष्यात? पण माझा प्रश्न नेमका उलटा आहे. समजा भरपेट जेवण करून तृप्त होऊन तुम्ही छान झोप काढली आहे. मग उठल्यावर कसे प्रसन्न वाटते. असे जर आयुष्य गेले असेल आणि आता निवृत्त आयुष्य पण सुखात जात असेल, तर मग काय करावे? म्हणजे नुसतं सोफ्यावर बसून टीव्ही तरी किती बघणार? पुढे काय? छ्या, तुम्ही आयुष्य जगलाच नाहीत, असं कुणी म्हटलं की उत्तर काय देणार?