सध्या दिवसेंदिवस ग्राहकाची गळचेपी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याची थोडक्यात माहिती देण्यासाठी हा प्रपंच.
१. किंमती स्पष्ट आणि सुलभ पद्धतीने दाखवल्या जात नाहीत, खूप फसवाफसवी केली जाते. हे प्रकार विशेषतः ऑनलाईन खरेदीत जास्त दिसतात. शिपिंगला किती पैसे लागतील ते मुद्दाम सांगितले जात नाही वगैरे.
२. कुठलीही वस्तू किंवा सुविधा मालकी तत्त्वावर विकण्याऐवजी, भाड्याने विकली जाते. उदा. बरीचशी ई-पुस्तके. किण्डलवरील, तुम्ही विकत घेतलेली पुस्तके अॅमेझॉन त्यांच्या मर्जीनुसार उडवू शकते.
३. फक्त एकदाच माल विकण्याऐवजी subscription model ग्राहकाच्या गळ्यात मारले जाते. बर्याचदा हा प्रकार नकळत केला जातो.
४. हे subscription model ग्राहकाला सहजपणे रद्द करता येऊ नये, म्हणून त्याला जास्तीत जास्त त्रास दिला जातो. उदा. न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्र.
५. ग्राहकाने विकत घेतलेली वस्तू त्याला स्वतःला किंवा इतरांकडून दुरुस्त करता येऊ नये म्हणून Right-to-repair ला विरोध केला जातो. उदा. अॅपल, जॉन डिअर (ट्रॅक्टर कंपनी)
६. Dark patterns वापरले जातात. उदा. अकाउंट सहजासहजी बंद करता येत नाही.
७. वस्तू विकत घेण्यापूर्वी तुलना करता येऊ नये म्हणून एकच प्रॉडक्ट वेगवेगळ्या नावाने विकले जातात किंवा छापील किमतीपेक्षा कमी किमतीत विकायला रिटेलर्सना बंदी केली जाते. बर्याच लक्झरी प्रॉडक्टसाठी हा प्रकार केला जातो.
८. खूपश्या टेक कंपन्यांनी, व्यक्तीबरोबर प्रत्यक्ष बोलून सपोर्ट देण्याचा मार्ग बंद केला आहे. फक्त ईमेलवरच उत्तर मिळते. खूप त्रास झाला तर ग्राहकाला सोशल मिडियाचा आधार घ्यावा लागतो आणि आरडाओरडा करून कंपनी मदत करेल याची वाट बघावी लागते.
९. बहुतेक सगळीकडे लवाद (arbitration) चाच पर्याय असतो, कंपनीला कोर्टात खेचता येत नाही.
१०. कंपन्या मात्र कुठलेही कारण न देता तुमचे अकाउंट बंद किंवा पूर्णपणे रद्द करू शकतात आणि त्याबद्दल कुणाकडेही दाद मागण्याचा पर्याय ग्राहकाला उपलब्ध नसतो. गूगल, अॅपल, फेसबुक, ई-बे, पेपाल (PayPal), स्ट्राईप (Stripe पेमेंट गेटवे), अॅमॅझॉन आणि अशा अनेक कंपन्यांनी हे उद्योग केले आहेत आणि अजूनही करतात.
११. आता काही कंपन्या ग्राहकांना “स्कोअर” देतात. जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळते, नाही तर चांगली सर्व्हिस मिळत नाही उदा. तुम्हाला फोनवर मुद्दाम जास्त वेळ होल्डवर ठेवले जाते वगैरे.
१२. स्वतःच्या मर्जीने नियम बनवू शकतात आणि ग्राहकाला पटत नसूनही गरजेस्तव ते मान्य करावे लागतात. उदा. एक कंपनी आता भाडेकरूंना प्रत्यक्ष किल्ली देत नाही, फक्त मोबाईल अॅप वापरूनच प्रवेश मिळेल अशी जबरदस्ती करते. काही ठिकाणी Bio-metric (हाताचे ठसे, डोळे, Face recognition) इ. माहिती वापरावी लागते.
त्यामुळे कुठल्याही कंपनी बरोबर व्यवहार करताना वरील गोष्टींचा विचार नक्की करा.