भारतातील इंजिनिअर आणि शिक्षण व्यवस्था

संदर्भ:

>> आक्षेप १: इंजिनिअरांची अशी संघटना नाही.

आहेत. Institute of Engineers, The Institution of Electronics and Telecommunication Engineers (I.E.T.E.) ISA, तसेच परदेशात Professional Engineers अशा अनेक संघटना आहेत. इंजिनिअरवर नियंत्रण करण्यापेक्षा त्यांचा मुख्य उद्देश असतो की त्यांच्या मेंबर्सचा इंटरेस्ट सांभाळणे आणि त्यांचा फायदा बघणे. मग ते स्वतःची स्टॅण्डर्ड काढतात, लॉबिंग करतात वगैरे.

>> आक्षेप २: इंजिनिअरिंग व इतर क्षेत्रांतल्या शिक्षणातला एक महत्त्वाचा फरक म्हणजे त्या कोर्सेस मध्ये फील्डवर्क चे प्रमाण खूप जास्त असते. इंजिनिअरिंगच्या शिक्षणात हे फिल्डवर्क फार फार कमी असते.

भारतात मूलभूत संशोधन फार कमी प्रमाणात होते. IIT, COEP, VJTI, BITS वगैरे प्रसिध्द कॉलेजात किती पेपर्स पब्लिश होतात आणि कितीकिती पेटंट्स मिळाली आहेत, हाच एक संशोधनाचा विषय होईल. मुख्य प्रॉब्लेम म्हणजे कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यात विचारविनिमय फारसा होत नाही, त्यामुळे इंडस्ट्रीत काय पाहिजे, नवीन शोध काय लागत आहेत आणि ते कसे वापरात येत आहेत, हे लक्षात न घेताच कॉलेजात शिक्षण दिले जाते.

>> आक्षेप ३: त्यामुळे इतर व्यवसायाचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो ‘मार्केट रेडी’ असतो. इंजिनिअर तसा नसतो.

इंजिनिअरिंग कॉलेज हे नोकर तयार करण्याचे कारखाने आहेत, हे पटले तर असा प्रश्न पडणार नाही. प्रत्येक कंपनीमध्ये प्रॉडक्ट, प्रोसेस हे वेगवेगळे असतात, त्यामुळे कोणीही नवीन आला तरी त्याला हे शिकावेच लागते. इंजिनिअर घेताना कंपनी त्यांची रिस्क कमी करायला बघते. जर कोणी इंजिनिअर असेल तर त्याला/तिला किमान थियरी तरी माहीत आहे, त्यामुळे तो/ती काम करायला लवकर तयार होईल, असा विचार असतो. To quote Nikola Tesla: “If Edison had a needle to find in a haystack, he would proceed at once with the diligence of the bee to examine straw after straw until he found the object of his search. I was a sorry witness of such doings, knowing that a little theory and calculation would have saved him ninety per cent of his labor.”

>> आक्षेप ४: शिक्षणातला दुसरा मोठा फरक म्हणजे शिकवणारे शिक्षक

पुन्हा तोच मुद्दा. बहुतेक शिक्षक फक्त शिक्षण क्षेत्रातले असल्याने बाहेरच्या जगात काय चालले आहे, त्याची त्यांना फारशी कल्पना नसते किंवा त्यांना त्याच्याशी काही देणेघेणे नसते. चांगले शिकवायला शिक्षक उदास असतात आणि काहीतरी नवीन शिकावे असा विचार करायला विद्यार्थी उदास असतात. त्यामुळे बहुतेक सगळे पाट्या टाकायचे काम करतात. काही-काही चांगले शिक्षक असतात, नाही असे नाही, पण बहुतेक वेळा ते अपवाद म्हणूनच.

इंजिनिअर होणे हे सी.ए. किंवा डॉक्टर होण्यापेक्षा खूप सोपे आहे. (वैयक्तिक मत). इंजिनियरींगला अ‍ॅडमिशन मिळणे कठीण आहे, पण एकदा कॉलेजात शिरलात की जर above-average असाल तर कोणीही पास होऊ शकतो. डिस्टिंक्शन मिळवणे अजिबात कठीण नाही, हे स्वानुभवावरून सांगू शकतो. किमान फर्स्टक्लास तरी आरामात मिळू शकतो, त्यामुळे कोणी एटीकेटी किंवा जयकर रुलचे उदाहरण दिले की आश्चर्य वाटते. (मलातरी).

एका सरांबद्दल लिहिल्याशिवाय राहावत नाही. मी तोंडी परीक्षा द्यायला गेलो तेव्हा संवाद काहीसा असा झाला.
“या, अभ्यास झाला का?”
“केलाय सर जमेल तेव्हडा” (मनातः मास्तर, आता तुम्ही माझी बिनपाण्याने करणार, मग मानभावीपणा कशाला करताय?)
“तुझ्या घरी फ्रीज आहे का?” (काय येडझवा मास्तर आहे हा. हा काय प्रश्न आहे?)
“आहे सर”.
“फ्रीजच्या मागे डोकावून बघितलेस का कधी? त्याच्यात काय-काय पार्ट असतात?”
“सर, मागे जाळी असते आणि काँप्रेसरपण असतो.”
“बरं, मला सांग काँप्रेसर कुठल्या रंगाचा असतो?” (आयला, मास्तर काय येडा आहे की काय? असलं काय विचारतोय?)
“काळा सर” (कोणी xतिया पण सांगेल).
“काळाच का?”
“कारण काळा रंग स्वस्त असतो म्हणून सर” (कसा पकडला या मास्तरला. हाहा!!)
“बरोबर आहे, पण विषयाला धरून नाही. मला अपेक्षित उत्तर वेगळे आहे. काळाच का? जांभळा, पिवळा, लाल का नाही?”
“सर, जरा विचार करून सांगतो”.
“ठीक आहे.”
(१ मिनिटानी)
“सर, नक्की माहीत नाही, पण प्रयत्न करतो. काँप्रेसरमध्ये काँप्रेशन होते, त्यामुळे हीट निर्माण होते. आता ही उष्णता बाहेर टाकायची तर ब्लॅकबॉडी सर्वोत्तम. म्हणून त्याला काळा रंग देतात म्हणजे जास्तीत-जास्त हीट लवकर बाहेर टाकली जाईल”.
“बरोबर, आता सांग, बोर्डॉन ट्यूब (Bourdon tube) कुठे वापरतात?”
“माहीत नाही सर.”
“अरे, विचार कर.”
“नाही माहीत सर.”
“तू स्कूटरमध्ये कधी हवा भरली आहेस का?”
“नाही सर, माझ्याकडे स्कूटर नाही, सायकल आहे”
“अरे, पण पेट्रोल पंपावर गेला असशील ना? तिथे जो प्रेशर दाखवायचा काटा असतो ना, त्याच्या आत बोर्डॉन ट्यूब असते. एकीकडे प्रेशर दिले की काटा फिरतो, तो त्याच्यामुळे.”
“बरं, आता सांग, सोडियम व्हेपरचे पिवळे दिवे चांगले की मर्क्युरी व्हेपरचे पांढरे?”
“सर, पांढरे चांगले वाटतात डोळ्यांना, म्हणून ते चांगले” (आता जास्ती काही विचारू नकोस ना….)
“बरं, आता सांग बजाजच्या फॅक्टरीत गेलास का कधी फिरायला कोणाबरोबर”
“नाही सर”
“बर, एखादी फॅक्टरी बघितली का ज्याच्यात फिरती मशीन्स असतात?”
“हो, बघितली आहे”
“त्याच्यात पिवळे दिवे असतात की पांढरे?”
“बहुतेकदा पिवळे असतात, सर”
“का? तू तर आत्ताच म्हणालास ना की पांढरे चांगले वाटतात डोळ्यांना. मग?”
“सर, फिरत्या मशीनमुळे आणि प्रकाशाच्या वेव्हलेंथ जुळली तर स्ट्रोबोस्कोपिक एफेक्टने मशीन फिरत असून पण स्थिर वाटेल. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे”.
“आता सांग, घरी ट्यूबलाईट वापरणे चांगले की बल्ब?”
“सर, ट्यूबलाईट”
“का”
“ट्यूबलाईट २६ वॉटची असते आणि बल्ब ६० वॉटचा”
“चूक. मी पाहिजे तर २५ वॉटचा दिवा लावीन. शिवाय ट्यूबच्या चोकमध्ये पण एनर्जी लॉस होतो ना?”
“कारण ट्यूबलाईटमध्ये सावली पडत नाही आणि बल्बने पडते. त्याने कटकट वाटते डोळ्यांना” (मी फेक मारली.)
“पुन्हा चूक” (इथे सरांनी पेन टेबलच्या अगदी जवळ पकडून पडणारी अंधूक सावली दाखवली.)
“सर, बल्बमध्ये खूप एनर्जी हीटमध्ये वाया जाते. त्यामुळे ल्युमेन्स पर वॉट ट्यूबलाईटला चांगले असते. म्हणजे ती जास्त एफिशियण्ट आहे.”
“बरोबर.”
“बरं, तुझी परीक्षा झाली. जा आता तू. पण बाहेर जाऊन मित्रांना सांगू नकोस प्रश्न आणि उत्तरे. मला इतरांना पण विचारायचे आहेत”.

आज या गोष्टीला कित्येक वर्ष झाली, पण अजूनही तो प्रसंग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे. त्या सरांनी अजून शिकवावे, असे वाटले होते, पण दुर्दैवाने त्यांनी एकच विषय शिकवला आणि संपूर्ण इंजिनियरिंगमध्ये मलातरी तसे सर पुन्हा कधीच भेटले नाहीत. आपल्या शिक्षणपध्दतीची ही खरी व्यथा आहे.

Posted in मनातलं | Leave a comment

बुजगावणं

कंपनीत काम करतय एक बुजगावणं!! क्लायंटला कामाचा भास निर्माण व्हावा म्हणून त्याचा जन्म!! बुजगावणं त्याचं काम चोख बजावत होतं. पण आपलं अस्तित्व हा एक आभास आहे ह्याची जाणीव नव्हती बिचाऱ्याला!! काम करता करता त्याचे हात हलत असत , त्याचं डोकं १८० अंशातूनही फिरून येत असे ह्यातच ते खुश होतं. आपल्याच विश्वात मग्न असणाऱ्या त्याला त्याच्यात आणि मॅनेजर या प्राण्यात असलेल्या फरकाबद्दल असलेली पूर्ण अनभिज्ञता हीच त्याच्या मुक्त मनाची ताकद होती…
अचानक असं काहीतरी झालं कि बुजगावणं शहाणं झालं ! आपण मॅनेजरप्रमाणे नाही आणि कधीच होवू शकणार नाही हे समजलं त्याला! जशी स्वत:च्या निर्जीवपणाची जाणीव झाली तसं ते बुजु लागलं, त्याने आपले कान बंद केले, डोळेसुद्धा मिटून घेतले…
आजही बुजगावणं आहे, त्याच कंपनीत, वाऱ्यावर अजूनही ते हलतं पण नाईलाजाने. बाह्यत: त्याचा उपयोग अजूनही होतो पण त्याचं असणं आणि नसणं हे त्याच्यादृष्टीने तरी सारखंच आहे!!

मी स्वतःला बुजगावण्याच्या जागी बघितले आणि सगळे तंतोतंत पटले.

Posted in मनातलं | Leave a comment

आयुष्यातली साथ

आयुष्य समाधानात जाण्यासाठी फक्त ४ जणांची साथ असणे जरुरीचे आहे. त्यापैकी २ म्हणजे आई-वडील, मग स्पाऊस (आयुष्यातील जोडीदार) आणि चांगला बॉस. यांना आपण निवडू शकत नाही, ते आपल्याला निवडतात. त्यामुळे हे ४ जण फार महत्वाचे आहेत. बाकी सगळे म्हणजे प्रवासातले साथीदार, आले काय नी गेले काय, फारसा फरक पडत नाही. अगदीच कुणी आवडले नाही, तर स्वतःहून दूर होता येते. म्हणून या ४ जणांशी जपून वागा, विशेषतः आपली बाजू कमकुवत असेल तर नक्कीच.

Posted in मनातलं | Leave a comment

निकाल

निकाल आणि इतर छायाचित्रांबद्दल थोडे परीक्षणः
सर्वसाक्षी यांची अबू सिंबेलची छायाचित्रे ओव्हरएक्स्पोस्ड वाटली. अबू सिंबेलच्या छायाचित्रांसाठी फिल्टर वापरायला हवा होता म्हणजे अजून चांगला परिणाम दिसला असता. जुरॉन्ग पार्कचे छायाचित्र स्पर्धेसाठी एकदम फिट बसले असते, पण ते स्पर्धेसाठी न्हवते.
अदिती यांची छायाचित्रे अंडरएक्स्पोस्ड वाटली.
ऋषिकेश यांच्या सेंट्रल पार्कच्या चित्रात दोन तृतियांश फ्रेममध्ये विखुरलेली पाने दिसत आहेत, त्यामुळे ती “पाने” हा मूळ विषय झाला आहे. ते छायाचित्र मी असे काढले असते
सेंट्रल पार्क
नंदन यांनी पहिल्या आणि दुसर्या फोटोसाठी फिल्टर वापरायला हवा होता असे वाटते. विशेषतः क्रेटर लेक, ऑरेगनच्या फोटोत फक्त १च रंग प्रामुख्याने दिसत आहे.
बोका यांचा लोणार सरोवराचा फोटो छान वाटला, पण ढग जरा जास्तच आणि राखाडी दिसत आहेत असे वाटले. निळ्या आकाशात पांढरे ढग छान दिसले असते. (अर्थात त्याच्यासाठी कदाचित तसे वातावरण नसेल किंवा जास्त वेळ थांबावे लागले असते).
ऋता यांचे छायाचित्र मी असे काढले असते
सान मारिनो बाकीच्या २ छायाचित्रांमध्ये त्यांनी काँपोसिशनवर जरा जास्त लक्ष द्यायला पाहिजे असे वाटले. मिसळपाववर स्वॅप्स यांनी काँपोसिशनवर १ लेख लिहिला आहे तो जरूर बघावा, असे सुचवीन.
अतिशहाणा यांची माळशेज आणि मुन्नारची छायाचित्रे छान वाटली. पॅनोरॅमिक मोडमध्ये घेण्याचा पण प्रयत्न करून बघावा, असे सुचवावेसे वाटते. घराच्या फोटोमध्ये रेषांचा वापर छान वाटला, त्यामुळे चित्राच्या डावीकडे असणारा सोलार पॅनेलचा खांब डोळ्याला खुपत नाही.

बाबा बर्वे यांनी फोटोत बोटीला अजून क्लोजपमध्ये, फ्रेममध्ये उजव्या १/३ भागात टिपले असते, तर अजून चांगले वाटले असते. तसेच शटरचा कालावधी वाढवून, पाणी जरा धूसर अजून चांगले दिसले असते. सूर्यबिंब सुंदर दिसत आहे.
मी यांनी तोरणा २ मध्ये लाल रंगाची साडी, लाल पाउलवाट आणि काँट्रास्टला हिरवे झाड हे “सेंटर ऑफ इंटरेस्ट” धरून १ प्रयत्न करावा, असे वाटते.

तर्कतीर्थ आणि धनंजय यांची काही छायाचित्रे येतील, अशी अपेक्षा होती पण ती फोल ठरली. सर्वसाक्षी, मी, वाचक, अपरिमेय, यसवायजी यांची छायाचित्रे स्पर्धेसाठी न्हवती त्यामुळेसुद्धा थोडा विरस झाला.

आता निकालः
क्रमांक ३
अस्वल यांचे छायाचित्रः पर्वत ताल
पर्वताच्या वेगवेगळ्या छटा खूप छान आणि खुलून दिसत आहेत.
ते छायाचित्र मी असे काढले असते
पर्वत ताल

क्रमांक २
रुची यांचे छायाचित्रः काय्लमोर अ‍ॅबी- कॉनेमारा, आयर्लंड

अतिशय सुंदर काँपोसिशन, अगदी स्पष्ट “सेंटर ऑफ इंटरेस्ट”, विषयाला अनुरूप छायाचित्र. पाण्यात सॉफ्टनेस वाटत आहे आणि त्यात कॅसलचे प्रतिबिंब पण छान दिसत आहे. छायाचित्रात डाव्या बाजूला दिसणारा मुलगा, छायाचित्र अजून रोचक करत आहे. १/३ चा नियम वापरलाय हे दिसून येतंय. खरंतर हे छायाचित्र पहिल्या नंबरला येणार, पण तांत्रिक माहिती दिली नाही म्हणून १/२ गुण वजा केला. ः)

क्रमांक १
नंदन यांचे छायाचित्रः वेगवेगळे फुगे उमलले

हे सुद्धा अतिशय सुंदर काँपोसिशन, अगदी स्पष्ट “सेंटर ऑफ इंटरेस्ट”, विषयाला अनुरूप छायाचित्र. मुख्य बलून फ्रेममध्ये डाव्या १/३ भागात आहे, त्यामुळे तो फोकल पॉईंट होतो आणि नंतर नजर अलगदपणे इतर बलून्सवर जाते. व्हाइट बॅलन्सपण एकदम अचूक वाटला. लाल आणि हिरव्या रंगातला काँट्रास्ट छान पकडला आहे.

पुढील आव्हान नंदन यांनी द्यावे, अशी त्यांना विनंती.

Posted in मनातलं | Leave a comment

मुलांचे शिक्षण

आत्ताच मिसळपाववर हा लेख वाचला. त्यात बरेच वेगळेवेगळे मुद्दे आले आहेत.

१. आपली प्रतिष्ठा मुलाच्या परीक्षेतील यश अपयश यावर अवलंबून असू नये. – हे एकदम मान्य आहे.
२. मुलाची/मुलीची क्षमता ओळखली पाहिजे – सहमत.
३. लोक फुकटचे सल्ले देण्यात एकदम पुढे असतात. – सहमत.

(आता माझा फुकटचा सल्ला)
डॉक्टरसाहेब म्हणतात

“त्याच्या चार वर्षाच्या अभियांत्रिकी ज्ञानापैकी फार तर २० टक्के ज्ञानाचा उपयोग होईल. तो आयुष्यात पुढे काय करणार आहे हे तुम्हाला कुठे माहिती आहे?”

हे तर कुठल्याही क्षेत्रात खरं आहे. अभियांत्रिकी झालो तर दहावीमध्ये शिकलेल्या इतिहासाचा काय उपयोग? डॉक्टर झालो तर बारावीत शिकलेल्या इंटिग्रेशनचा काय उपयोग? बी.एस.सी. करून मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह झालो, तर शिकलेल्या भौतिकशास्त्राचा काय उपयोग?

“शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते.”

तसं जर असेल, तर मग IAS च्या परीक्षेची तयारी करणारा अभियांत्रिकी व्हायची काय गरज आहे, बी.ए. पण चालेल की? याचे कारण म्हणजे रिस्क मॅनॅजमेंट. IAS परीक्षा पास नाही झाला तर अभियांत्रिकी होऊन कुठेतरी नोकरी तरी मिळू शकेल, बी.ए. होण्यापेक्षा बरे, असा त्यामागचा विचार असतो.

शिक्षणाचा उपयोग काय? तर तुम्हाला अधिक चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या मुलाला काय शिकायचे आहे, ते आधीच माहित आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण सगळ्याच (रादर बहुतेक) मुलांना असे माहीत नसते. चांगले कॉलेज का हवे तर त्याने तुम्हाला एक चांगला ब्रॅंड मिळतो, ज्यामुळे तुम्ही आयुष्याची सुरुवात थोड्या वरच्या पातळीवरून करू शकता. साधी गोष्ट आहे, कॉलेजने १७ लाख मागितले, तर तुम्ही विचारलंत ना की सुरुवातीचे पॅकेज ४ लाख(च) आहे का? तेच जर आय.आय.एम मध्ये १० लाख फी भरून २५ लाखाचे पॅकेज मिळाले असते, तर कसे वाटले असते?

“मुलाचा शिक्षणाचा कल महत्त्वाचा आहे.”

“पदवी मिळाल्यावर एक वर्ष तू काहीही केले नाहीस तरी चालेल. नुसता हातात कैमेरा घेऊन भारतभर फिरलास तरी चालेल. त्यात तुला आयुष्य जगायचे शिक्षण मिळेल ते तुला आयुष्यभर उपयोगी ठरेल.”

हे असे डायलॉग ३ एडियट सारख्या सिनेमात टाळ्या वाजवायला छान वाटतात. हातात कॅमेरा द्यायचा असेल तर मग आत्ताच का नको, पदवी मिळायची तरी का वाट बघायची? आज भारतासारख्या देशात, जिथे स्पर्धा इतकी बिकट आहे, तिथे अशी चैन बहुतेकांना परवडत नाही.

“पं. मल्लिकार्जुन मन्सूर. पं शिवकुमार शर्मा यांचे गायन / वादन पाहताना एक गोष्ट जाणवते कि ते आपल्या कार्यक्रमाचा आनंद पूर्णत्वाने घेतात त्यात त्यांना कष्ट होताना दिसत नाहीत असेच आपले शिक्षण आणि व्यवसाय असावा मग त्यात पैसे किती मिळाले किंवा नाही हे गौण असावे.”

“चित्रकला उत्कृष्ट असणारी माणसे रस्त्यावर चित्र काढून लोकांनी फेकलेले पैसे का उचलतात कारण आपली कला बाजारात विकायची कशी यासाठी लागणारे कौशल्य किंवा त्याला लागणारे संबंध त्यांच्याकडे नसतात.”

सर्वच जण कौशल्य असूनही यशस्वी होत नाहीत. त्याला नशीबपण लागते. जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन करणारा एम.एफ.हुसेन हजारात एखादाच होतो. बाकीचे त्याच गॅलरीसमोर फुटपाथवर प्रदर्शन लावून बसलेले असतात.

म्हणून मी माझ्या भाच्याला तो दहावीत असताना सांगितले होते की तू आता ७ वर्ष नीट अभ्यास करून यश मिळवलेस तर पुढची ७० वर्ष आरामात जगशील. पण त्याऐवजी आता ७ वर्ष आराम केलास तर पुढे ७० वर्ष भोगशील. आता तुला काय करायचं आहे, ते तू ठरव. (त्याची क्षमता काय आहे, ते ओळखून तितपतच अपेक्षा ठेवणे, इतपतच पालकांनी करावे.)

माझे मत आहे की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वतःला एक प्रॉडक्ट म्हणून समजले पाहिजे, एक एम्प्लॉई म्हणून नाही. आणि स्वतःचे मार्केटिंग व्यवस्थित केले पाहिजे आणि डोळे उघडे ठेऊन अजून कुठल्या नवीन संधी येत आहेत, ते बघितले पाहिजे. आपण स्वतः यशस्वी होत नसतो, तर इतर लोक आपल्याला यशस्वी करतात.

साधारणपणे यश, पैसा, कीर्ती, self-confidence, समाजातली पत हे एकत्रीत असतात. स्वतःच्या कर्तबगारीवर/आत्मविश्वासावर पैसा मिळू शकतो आणि खूप पैसा मिळाला की आत्मविश्वासपण वाढू शकतो. मग सोपा मार्ग का घेऊ नये?

शेवटी काय, आयुष्यात आपले समाधान कशात आहे ते प्रत्येकाला स्वतःलाच शोधावे लागते. पण खिशात भरपूर पैसा असेल, तर ते काम अधिक सोपे होते. Money can buy you happiness, but happiness cannot buy you money.

Posted in मनातलं | Leave a comment

फोटोचे परीक्षण

आता ऐसीअक्षरेवर फोटोचे परीक्षण करायचे आहे. त्यासाठी काय-काय बाबी लक्षात घ्याव्या लागतील? माझ्यामते सर्वात महत्वाचा ते कमी महत्वाचा हा क्रम पुढीलप्रमाणे आहे.
१. सर्वात महत्वाचे म्हणजे मुख्य थीम काय आहे? स्पष्ट “सेंटर ऑफ इंटरेस्ट” आहे का? फोटोमध्ये नजर कशावर खिळून राहते?
२. फोटोचे कंपोझिशन कसे आहे? रूल ऑफ थर्ड कितपत आहे? फोटोमध्ये अनावश्यक किंवा डिस्टर्बिंग काही आहे का?
३. फोटोचा शार्पनेस कसा आहे? फोटो शार्प आहे का आणि एक्स्पोजर व्यवस्थित आहे का? depth of field , बोके कितपत आहे? direction of light, depth of field, फोकस हे फोटोला विचलीत तर करत नाहीत ना?
४. Does the photo tell a story? रंगसंगती नैसर्गिक (natural ) वाटते का? नसेल तर रंगसंगती मुख्य थीमला मारक नाहीये ना?
५. प्रकाशयोजना कशी आहे? फ्लॅश, फिल फ्लॅश, रिफ्लेक्टर वापरून अजून काही सुधारणा करता आली असती का? व्हाइट बॅलंन्स कसा आहे, ISO ठीक आहे का की फोटोमध्ये नॉइज दिसतोय?
६. क्रिएटीव्हीटी कितपत आहे? हा फोटो वेगळ्या प्रकारे किंवा अजून चांगला घेता आला असता का?

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

स्वमग्नता

आत्ताच ऐसीअक्षरेवर स्वमग्नता एकलकोंडेकर या लेखिकेचा लेख वाचला आणि मग तिने लिहिलेले सगळे लेख वाचले. लेखिकेने ऑटिझम, म्हणजे स्वमग्नता या विषयावर लेख लिहिले आहेत. तिचा मुलगा हा स्वमग्न आहे. लेख चांगले माहितीपूर्ण आहेत. प्रतिक्रियांमध्ये लोकांनी तिचे कौतुक केले आहे. पण माझे विचार इतरांपेक्षा जरा वेगळे आहेत.

सर्वप्रथम माझ्या लक्षात आले की या लेखिकेने स्वमग्नता या एकाच विषयावर ९ लेख लिहिले आहेत. बाकी कशावरही १ ओळसुद्धा लिहिली नाही. “मी Mother Warrior आहे.” असे ती म्हणते.

तिच्या मुलाला स्वमग्नता आहे. ही नक्कीच वाईट गोष्ट आहे. But it is fait accompli. त्यामुळे तिला सहानुभुती दाखवण्याखेरीज आम्ही काय करणार? माझ्या बॉसची दोन्ही मुले स्वमग्न आहेत, पण तो कधीही तसे जाणवू देत नाही. मग लेखिकेचा मुलगा त्यांच्यापेक्षा काही फार वेगळा नाहीये. आणि स्वमग्नतेबद्दल ९ लेख ऐसीअक्षरेवर लिहिण्याचा हेतू मला काही कळला नाही. उद्या “अंध लोकांनी त्यांच्या रोजच्या जीवनात इंटरनेट कसे वापरावे ” असे लेख मी जर अंध लोकांच्या फोरमवर लिहिले तर एकवेळ लोक समजून घेतील, पण असे ९ लेख ऐसीअक्षरेवर लिहिले तर त्याला काही अर्थ आहे का? त्यामुळे मलातरी एकंदरीत हा स्वकौतुक करण्याचा प्रकार वाटला.

Posted in मनातलं | 1 Comment

घर

आत्ताच माझ्या घराचे उरलेले लोन फेडून परत आलो. आता खूप बरे वाटत आहे कारण आता घर स्वतःचे, पूर्ण मालकीचे झाले आहे. हा आनंद काही औरच आहे. पण हे काही माझे पहिले घर नाही.

खरं सांगू का? मी आयुष्यात पहिल्यांदा घर घेतलं ना, तेव्हा मला जितका आनंद झाला, तितका नंतर कधीच झाला नाही आणि कदाचित पुन्हा कधी होणारही नाही. त्याला कारण पण तसंच आहे. मी बाबांना सांगूनसुद्धा त्यांनी स्वतः घर घेतले नाही. आणि माझी नोकरी होती फिरतीची. मग मी स्वतःसाठी तरी घर कसं काय बघणार? बाबांना सांगितलं की तुम्ही घेत नाही तर मलातरी पैसे द्याल का? तर कुरकूर करत, फारतर १ लाख देईन म्हणाले. माझ्या मामाने सांगितलं की गोरेगावला त्याच्या सोसायटीत १ रूम किचन ६ लाखात आहे. त्या माणसाला गरज आहे, म्हणून त्याने किंमत कमी लावली आहे, तू नक्की घे. पण तेव्हा माझं वय होतं फक्त २३. खिशात दमडी नाही, घर घेणार तरी कुठून? मुंबईत अगदी चाळीत जागा घ्यायला पण त्याकाळी ४-५ लाख तरी लागत.

मी मनाशी ठरवलं की काहीही झालं तरी मी ५ वर्षाच्या आत स्वतःची जागा घेणार. त्याप्रमाणे मी पैसे साठवायला सुरुवात केली. त्याकाळी माझा पगार इतरांच्या मानाने चांगला होता (महिना ३.५ हजार) शिवाय नशीबाने पण साथ दिली म्हणून मी स्टॉक मार्केटमध्ये थोडे कमवले नी ३ वर्षात ५० हजार जमा केले. त्याकाळी एच.डी.एफ.सी.ने घरासाठी लोन द्यायला नुकतीच सुरुवात केली होती. त्यांच्याकडे गेलो, तर ते म्हणाले की आम्ही तुला २ लाख १० हजाराचे कर्ज देऊ. म्हणजे माझं बजेट होतं फार-फार तर ४ लाख. नशीबाने साथ मिळाली म्हणून जागा घेता आली. पण ३५०० रुपये महिना पगार असताना २७०८ रुपये दर महिना हप्ता देऊन घेतलेले घर म्हणजे माझ्या आयुष्यातली माझी सर्वात मोठी कमाई. कर्ज फेडून ते घर पूर्णपणे माझ्या हक्काचे झाले, तेव्हा जेव्हडा आनंद मला झाला, तेव्हडा आयुष्यात पुन्हा कधी होईल, याची शक्यता फार थोडी आहे.

Posted in मनातलं | Leave a comment

ऐसी अक्षरे

चर्चेला येणार्‍या कुठल्याही विषयावर स्वतःचे मत असणे, साधारणपणे गंभीर (सिरियस) विषयांवर तावातावाने काथ्याकूट करणे, आपल्या मताविरुद्ध कोणी मतप्रदर्शन केले की विदा मागणे, सरळ-सोप्या भाषेत बोलण्याऐवजी क्लिष्ट भाषेत बोलणे हा ऐसीचा यूएसपी आहे, असे मला वाटते. ऐसीवर साधारणतः “आर्मचेअर फिलॉसॉफर्सचा” वावर जास्त दिसतो (असे माझे मत आहे).

मिपावर ऐसीपेक्षा अधिक हलके-फुलके वातावरण आहे, असे मला वाटते. अर्थात ऐसीने दुसरे मिपा व्हायची गरज नाही, गंभीर चर्चा हा ऐसीचा “ब्रँड” होऊ शकतो. एका हाताला “कॉलेज कट्टा टाईप मिपा” आणि दुसर्‍या हाताला “मराठी विकिपिडिया” याच्या मधली जागा ऐसी घेऊ शकेल. वर मी म्हणालो त्याप्रमाणे यूएसपी ठेवायचा असेल तर ऐसी इस ऑन राईट ट्रॅक.

ऐसीवर मला आवडणारी सदरे म्हणजे छायाचित्रण पाक्षिक-आव्हान, मुलाखती, ही बातमी समजली का?, अलीकडे काय पाहिलंत, सध्या काय ऐकताय/ ऐकलत?, माहितीचे लेख (चंद्रशेखर, प्रभाकर नानावटी यांचे लेख) इ.

Posted in मनातलं | Leave a comment

गुंतवणूकीबद्दल माझे विचार

१. गुंतवणूक करण्यासाठी भांडवल लागते. जर तुमच्याकडे excess money (बचत) असेल तरच हे शक्य होणार. त्यासाठी काय करावे लागेल? उत्पन्न वाढवावे लागेल किंवा खर्च कमी करावा लागेल. (दोन्ही झाले तर सोन्याहून पिवळे).
२. आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गुंतवणूक तुम्ही स्वतःमध्ये केली पाहिजे. ती कशी काय? चांगली तब्बेत सांभाळून (सर सलामत तो पगडी पचास) आणि चांगले शिक्षण घेऊन (ज्यामुळे भविष्यातील गुंतवणूक करण्यासाठी, तुम्ही चांगला कॅशफ्लो निर्माण करू शकता). पैसे जास्त कसे मिळतील, याचा विचार करताना बरेच दिसतात, पण आपले शरीर (फुकटात) मिळाले आहे ना, म्हणून त्याच्याकडे पार दुर्लक्ष केलेले पण दिसतात.
३. स्वतःची रिस्क प्रोफाइल ओळखणे महत्वाचे आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग महत्वाचे आहे. कुणाचा व्यवसाय करण्याकडे कल असतो तर कुणाचा नोकरी करण्याकडे. कुणाला जास्त-रिस्क-जास्त-परतावा (high risk, high returns) हवा असतो, तर कुणाला सेफ गुंतवणूक हवी असते. पैशाची गरज कधी आहे, त्याप्रमाणे पण रिस्क प्रोफाइल बदलते. (शिक्षण, लग्न, जागेची खरेदी यासाठी १-२ वर्षात पैसे लागणार असतील, तर कमी जोखमीची गुंतवणूक लागते.) वयाप्रमाणेसुद्धा रिस्क प्रोफाइल बदलते.
४. चांगला गुंतवणूकीचा प्लॅन हा छोट्या-छोट्या पावलांनी बनत जातो. सुरुवात तर करा.
५. चक्रवाढ व्याज ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. (Compound interest is a beautiful thing.) त्याची माहिती करून घ्या. बचत करण्याची सवय आयुष्यात लवकर लागली, तर पुढे त्याचा खूप फायदा होतो.
६. त्यानंतर अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशनची माहिती करून घ्या. गुंतवणुकीत diversification का जरुरी आहे, ते समजून घ्या.
५. गुंतवणुकीत long term view लक्षात घ्या. ही १०० मिटर्सची धावदौड नाही, तर २६ मैलांची मॅरॅथॉन आहे, हे लक्षात असू द्या. Getting there is half the fun.
६. Quality of life is just as essential as a quality portfolio. A fine wine with dinner is just as important as the dinner itself.
७. पैसा कमवून झाला तरी त्याचा कुटुंबियांबरोबर, मित्रमैत्रीणींबरोबर उपभोग घ्या, त्यातून आनंद मिळवा. No one ever said on his deathbed, “I wish I spent more time in the office”.

Posted in अर्थशास्त्र, गुंतवणूक | Leave a comment