काल काही कामानिमित्त पनवेल म्युनिसिपल ऑफिसमध्ये जाण्याचा योग आला. मुंबईहून जायलाच अडीच तास लागले. साधारण सव्वा बाराच्या सुमारास ऑफिसमध्ये पोहोचलो. तिथून मृत्यू दाखला घ्यायचा होता. बघितले तर लोकांची झुंबड होती. लायनीत उभे राहणे हे भारतात अभावानीच दिसते, त्यामुळे आश्चर्य वाटले नाही. मी पण मग त्या घोळक्यात शिरलो आणि खिडकीजवळ जाऊन चौकशी केली. तेव्हा मला सांगितले की शेजारी विचारा. नशिबाने तिथे गर्दी थोडीशी कमी होती. तिथे त्या बाईना विचारले तर मला म्हणाल्या की नाव काय आहे, मृत्यू कुठे झाला आणि किती कॉपी हव्या आहेत? मी माहिती सांगताच थोडं थांबा म्हणाल्या. मग मोजून १० मिनिटात १० कॉपी सहीशिक्क्यासहीत हातात मिळाल्या आणि मी लगेच बाहेर पडलो. १० कॉपीजचे फक्त ५०० रुपये घेतले. हा खरंच सुखद धक्का होता. भारतात सगळीकडे टीका आणि नकारात्मता दिसते, पण चांगल्या गोष्टींचे कौतुकही झाले पाहिजे म्हणून हा प्रपंच.
सर्वच ठिकाणी नागरिकांना अशी सेवा मिळाली आणि पटापट कामे झाली, तर मग कोण कशाला टीका करेल? थोडीफार प्रगती होत आहे याचे खरंच कौतुक वाटले. पनवेल नगरपालिकेचे मनापासून आभार.